वोट चोरीविरोधात काँग्रेस गावागावात उतरणार!
संघटनात्मक बळकटीसाठी प्रत्येक तालुक्यात बैठका; प्रभारींचे दर आठवड्याला दौरे
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वोट चोरीच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी गावागावात चौपाल बैठका घेण्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रभारींचे दर आठवड्याला दौरे आयोजित केले जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मंगळवारी ओरोस येथील शिक्षक पतपेढी सभागृहात उत्साहात पार पडली. जिल्हा प्रभारी हुस्नबानो खलिपे, लोकसभा प्रभारी शशांक बावचकर आणि कुडाळ विधानसभा प्रभारी गौस खतीब यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी हुस्नबानो खलिपे म्हणाल्या, “पूर्वी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली आणि आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली क्रांती होणार आहे.” तर लोकसभा प्रभारी शशांक बावचकर यांनी, लोकसभेचे चित्र पालटण्याची ताकद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामाला गती देण्याचे आवाहन केले.
बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, गावागावातील चौपाल बैठका आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर जनजागृती करण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. प्रभारींकडून दर आठवड्याला प्रत्येक तालुक्याचा दौरा करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार छाननी समितीवर सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच नवनियुक्त सेल जिल्हाध्यक्ष तौकीर शेख (अल्पसंख्याक सेल), प्रवीण आचरेकर (ओबीसी सेल) आणि केतनकुमार गावडे (सोशल मीडिया सेल) यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीला जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, प्रकाश जैतापकर, ॲड. दिलीप नार्वेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी जिल्हा सरचिटणीस बाळा धाऊसकर यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

