Uncategorized

गॅस ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नगरसेविका नीलम नाईक यांचा पुढाकार.

MNGL कंपनीने सावंतवाडीत तातडीने कार्यालय सुरू करावे; मीटर रीडिंगसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा – नगरपरिषदेकडे ठाम मागणी

सावंतवाडी : शहरात MNGL कंपनीमार्फत बसविण्यात आलेल्या घरगुती गॅस जोडण्यांच्या ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक यांनी ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. गॅस बिलांची वसुली ऑनलाइन पद्धतीऐवजी ऑफलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मीटर रीडिंगसाठी परप्रांतीय कर्मचाऱ्यांऐवजी स्थानिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि नियुक्त कर्मचाऱ्यांना कंपनीचे अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी नगरपरिषद प्रशासन आणि MNGL कंपनीकडे केली आहे.

MNGL कंपनीच्या नावाने अनोळखी व्यक्तींकडून ग्राहकांना मोबाईलवर संपर्क साधला जाण्याची शक्यता लक्षात घेता, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कंपनीने अधिकृत आणि पारदर्शक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे नीलम नाईक यांनी स्पष्ट केले. मीटर रीडिंगसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख ग्राहकांना सहज पटावी, यासाठी त्यांच्याकडे कंपनीचे अधिकृत ओळखपत्र असणे बंधनकारक करावे, अशीही त्यांची भूमिका आहे.

तसेच MNGL कंपनीचे स्वतंत्र कार्यालय सावंतवाडी शहरात अद्याप सुरू नसल्याने ग्राहकांना तक्रारी, बिलासंदर्भातील अडचणी आणि इतर कामांसाठी गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी सावंतवाडी शहरात MNGL कंपनीने तातडीने स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
ग्राहकांची सुरक्षितता, पारदर्शक बिलिंग व्यवस्था आणि स्थानिकांना रोजगाराची संधी या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक यांनी आवाज उठवला आहे. त्यांच्या या मागण्यांमुळे सावंतवाडीतील MNGL गॅस ग्राहकांच्या प्रश्नांना आता वाचा फुटली असून, नगरपरिषद प्रशासन आणि कंपनी यावर कोणती ठोस कार्यवाही करतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!