सावंतवाडीत पांढऱ्या बलेनोचा थरार; अनेक वाहनांना धडक देत संरक्षक भिंतीवर आदळली कार
माजगाव गुलाबी तिठा परिसरातील घटना; MH 07 AS 7803 क्रमांकाच्या कारची चर्चा
सावंतवाडी : सावंतवाडी परिसरात MH 07 AS 7803 क्रमांकाच्या पांढऱ्या बलेनो कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. भाजप संपर्क कार्यालयासमोर अपघात झाल्यानंतर चालक तेथून निघून गेल्याची माहिती मिळत आहे.
त्यानंतर माजगाव येथील गुलाबी तिठा परिसरात या कारने आणखी एका बलेनो कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे गुलाबी तिठ्याजवळील गॅरेजपासून हाकेच्या अंतरावर संबंधित कार संरक्षक भिंतीला जाऊन आदळली.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते. संबंधित चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, या आरोपाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, अपघाताचे नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे


