Uncategorized

तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ‘पाहिजे’ आरोपी अखेर मुंबईत जेरबंद!

कणकवलीतील घरफोडी नव्हे, तर घरात काम करताना 3.7 तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास; एलसीबीच्या पथकाची ताडदेवमध्ये थरारक कारवाई

कणकवली : कणकवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या राज्यांत आपले अस्तित्व लपवून फिरणाऱ्या पाहिजे आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर मुंबईतील ताडदेव परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.

कणकवली पोलिस ठाण्यात 15 जून 2023 रोजी गुन्हा क्रमांक 172/2023 अन्वये भा.दं.वि. कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लीलाधर मोडाराम सुथार (वय 39, मूळ रा. पिंपासार नागोर, राजस्थान) हा फिर्यादी सतीश विजय नाईक यांच्या घरी सुमारे वर्षभर काम करत होता. याच काळात त्याने फिर्यादी यांच्या पत्नीचे 3.7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीचे लाकडी प्लायवूड चोरी करून पलायन केले होते.

गुन्हा घडल्यानंतर आरोपीने गोवा, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर आदी ठिकाणी वास्तव्य करत तब्बल तीन वर्षे पोलिसांना चकवा दिला. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो मुंबईतील ताडदेव परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील एलसीबीच्या पथकाने 6 ऑक्टोबर 2026 रोजी आराध्या आवान बिल्डिंगजवळ, भाटिया हॉस्पिटलच्या मागील परिसरात सापळा रचून लीलाधर सुथार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच कणकवली पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!