महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय पातळीवर दमदार कामगिरी :
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावून प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. गतवर्षी इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वीमध्ये शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले.
या परीक्षेत कु. स्पृहा अमेय आरोंदेकर हिने गतवर्षी इयत्ता सातवीमध्ये शिकत असताना जिल्ह्यात ११ वा क्रमांक, तसेच गतवर्षी इयत्ता चौथीमध्ये शिकत असताना कु. श्रीयांश संजय सावळ याने १५ वा क्रमांक व कु. नील सचिन शिंदे याने २४ वा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे जिल्हास्तरीय गुणवत्तापूर्ण यश त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे, मेहनतीचे आणि शैक्षणिक जिद्दीचे द्योतक ठरले आहे.
या उल्लेखनीय यशाची दखल घेत केंद्रप्रमुखांनी स्वतः प्रशालेस भेट देऊन या युवा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार केला. केंद्रप्रमुख श्री. संदीप निऊंगारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाल्याने त्यांच्या यशाला विशेष सन्मान प्राप्त झाला. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांनी कु. स्पृहा अमेय आरोंदेकर, कु. श्रीयांश संजय सावळ आणि कु. नील सचिन शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

