उभा बाजारात ‘महा आरोग्य शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी मोठी गर्दी
तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करण्याचा डॉक्टरांचा सल्ला; आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जनजागृती
सावंतवाडी : उभा बाजार येथील जीवन रक्षा कार्यालयात हनुमान मित्र मंडळ, अपना दवाखाना (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) आणि जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महा आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीपप्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विद्यमान नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, सौ. सायली दुभाषी, सौ. स्नेहा नाईक, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, अपना दवाखान्याचे डॉ. हर्ष साळगावकर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर, हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर, बाबल्या दुभाषी, यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर, अरुण भिसे, बाळू कासार, हर्षल पोकळे, सचिन मळीक, कुंदन टोपले, हर्ष कोरगावकर, कपिल कोरगावकर, परिचारिका तृप्ती अंधारी, गंगा सुतार, परिचर यशवंत परब, लॅब टेक्निशियन गायत्री वारंग यांच्यासह अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या.
यावेळी अपना दवाखान्याच्या अध्यक्षा सौ. सुकन्या टोपले यांनी प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी स्वतःची तसेच आई-वडील आणि मुलांची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. वेळेवर तपासणी केल्यास भविष्यातील आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
सौ. सायली दुभाषी यांनी अपना दवाखान्यामार्फत लिपीड प्रोफाईल, रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणी तसेच मोफत औषधांची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली.
डॉ. हर्ष साळगावकर यांनी अपना दवाखान्यात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत, रविवार व सरकारी सुट्टी वगळता, आरोग्य सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर यांनी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या आरोग्य कार्डाबाबत नागरिकांनी जागरूक होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य योजनांची माहितीही त्यांनी दिली. वय वाढल्यानंतर नियमित लिपीड प्रोफाईलसह आवश्यक आरोग्य तपासण्या करून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या उपक्रमातून नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, आजारांचे वेळेवर निदान आणि उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत बाबल्या दुभाषी यांनी केले, तर हनुमान मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

