◾आठ दिवसांत काय पुढच्या आठ महिन्यांत पाणी येणार नाही अशी आहे कालव्याची परिस्थिती…. आमदार केसरकर यांनी स्वतःच येऊन पाहणी करावी आणि मगच आश्वासन द्यावे..
◾इन्सुलीच्या कालव्याची परिस्थिती चिपी विमानतळासारखी,चालू वर्षी चिपीतुन विमानही उडणार नाही आणि इन्सुलीत कालव्याला पाणीही येणार नाही
◾येत्या १५ दिवसांत कालव्यामुळे उद्भवलेल्या समस्या दूर न केल्यास तिलारी प्रकल्प कार्यालयावर मॅरेथॉन आंदोलन छेडण्याचा स्वागत नाटेकर यांचा इशारा..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-३१ :- चिपीच्या विमानतळाप्रमाणेच श्री दीपक केसरकर यांनी तिलारी प्रकल्पाचे पाणी आठ दिवसात येईल असे मागच्या आठवड्यात सांगितले होते.सरकारी अधिकारी चुकीची माहिती देत असल्यामुळेच श्री दीपक केसरकर यांनी आश्वासने दिले होते. कुठच्याही प्रकारचे ग्राउंड रिपोर्टिंग नसताना इन्सुलीत तिलारी कालव्याला पाणी येईल असे सांगताना प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून जर आमदार केसरकर यांनी आश्वासन दिले असते तर बरे झाले असते.ओटवणे गावातील बरेच काम अजूनही शिल्लक आहे, जवळजवळ १०० मीटरची दगडाची जागा साफ करून काँक्रीट करणे आणि १०० मीटर अंतरातील माती गाळ काढणे हे अत्यंत जिकिरीचे काम अजूनही शिल्लक आहे.असे असून सुद्धा प्रकल्प अधिकारी अत्यंत आरामात कुठचेही कालमर्यादेचे भान न ठेवता आरामात काम करत आहेत.आठ दिवसांत काय पुढच्या आठ महिन्यांत इन्सुलीत अशा प्रकारची कामे चालली तर कालव्याला पाणी येणार नाही,ज्या शेतकऱ्यांनी जागा जमिनी प्रकल्पासाठी अगदी कवडीमोल किमतीने दिल्या त्या सर्व शेतकरी बांधवांना फसविण्याचे आणि शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे काम चालू आहे.श्री दीपक केसरकर यांनी आताच्या कालवा प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहून नंतरच पाणी कधी येईल यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती द्यावी,अन्यथा चिपीच्या विमानउड्डाण सारखा हा सुद्धा विषय चर्चेचा आणि विनोदाचाच भाग होईल असे वाटत आहे.मार्च अखेरपर्यंत चिपी विमानतळ चालू करण्यात येईल अशी शिवसेना नेत्यांनी ग्वाही दिली होती परंतु अद्यापही विमानतळ चालू होण्याची चिन्हे नाहीत, विमानतळासाठी लागणारी मुबलक वीज,पाणी,चांगले रस्ते अशा अजुन अनेक सुविधांचा अभाव आहे अशीच परिस्थिती इन्सुलीतील कालव्याचीही झाली आहे.
येत्या १५ दिवसांत जर इन्सुली गावातील कालव्यामुळे उद्भवलेल्या समस्या दूर न केल्यास शेतकऱ्यांना घेऊन तिलारी प्रकल्प कार्यालयावर मॅरेथॉन आंदोलन छेडण्याचा इशारा इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी दिला आहे.

