Uncategorized

आरोंदा येथे जल अर्पण कार्यक्रम संपन्न

निरोगी ग्रामस्थ हे सक्षम गावाचे आधारस्तंभ – प्रमोद कामत

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चे आवाहन

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरोंदा येथे ‘जल अर्पण कार्यक्रम’ उत्साहात संपन्न झाला. जाधववाडी नळपाणी योजनेचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आरोंदा हायस्कूल येथून रॅलीने झाली. या रॅलीमध्ये पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंचशील नगर-जाधववाडी येथील विहिरीवर मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यानंतर जल अर्पण कलशाच्या माध्यमातून जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली.
यानंतर आरोंदा ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामोन्नती मंडळ सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. दीपप्रज्वलन तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे सुपारी रोप देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, कार्यकारी अभियंता सुदेश राणे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, प्रशासक शुभदा कविटकर, पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी, माजी सरपंच सायली साळगावकर,नारायण कांबळी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व जाधववाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद कामत म्हणाले की, जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाल्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पिण्याचे शुद्ध पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून सुरक्षित पाण्यामुळे पाण्यामुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांपासून नागरिकांचे संरक्षण होण्यास मदत होते. ‘निरोगी ग्रामस्थ हे सक्षम गावाचे आधारस्तंभ आहेत,’ असे त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठा योजना उभारण्याबरोबरच तिची नियमित देखभाल, दुरुस्ती, योग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याची बचत करावी आणि नळपाणी योजनेच्या देखभाल व संरक्षणासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहनही कामत यांनी केले.
दादा साईल यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची बाब आहे. शुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि त्यातून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसह गावाच्या विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
तसेच भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. गावात बंधारे व वनराई बंधारे उभारून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन,आभार आरोंदा ग्रामपंचायत प्रशासक शुभदा कविटकर यांनी केले.
जल अर्पण कार्यक्रमात ग्रामस्थांचा आक्षेप प्रकर्षाने जाणवला.यावेळी विहिरीच्या नोंदीबाबत चौकशीची मागणी करण्यात आली.
जल अर्पण कार्यक्रमादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतही नाराजी व्यक्त केली. जाधववाडी येथील विहीर जल जीवन मिशनअंतर्गत कशी दाखविण्यात आली, असा सवाल ग्रामस्थ आबा केरकर यांच्यासह काही ग्रामस्थांनी उपस्थित केला.
जाधववाडी येथील जुनी विहीर रंगरंगोटी करून ती जल जीवन मिशनअंतर्गत असल्याचे पदाधिकाऱ्यांना भासविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आबा केरकर यांनी केली. तसेच जल जीवन मिशनअंतर्गत संबंधित विहीर अस्तित्वात नसल्याचा दावा त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिला.
यावेळी कार्यकारी अभियंता सुदेश राणे यांनी संबंधित विहीर तळवणे गावात असून तिचे अंतर अधिक असल्याने जाधववाडी येथील विहिरीवर कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, ग्रामस्थांनी या स्पष्टीकरणावरही नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!