कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

दूर्ग हनुमंत गडावर पोलीस पथक तैनात; हुल्लडबाज पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर

दूर्ग हनुमंत गडावर पोलीस पथक तैनात; हुल्लडबाज पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर

शुभम नाईक, दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या दूर्ग हनुमंत गडावर वाढत्या पर्यटनासोबत काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी, कचरा टाकणे, मद्यपान, धूम्रपान तसेच गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग यांनी दोडामार्ग पोलीस प्रशासन व तहसीलदार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.

या मागणीची तात्काळ दखल घेत प्रशासनाने रविवारपासून दूर्ग हनुमंत गडावर पोलीस प्रतिनिधी तैनात केले आहेत. गडावर येणाऱ्या पर्यटकांची तसेच त्यांच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, वाहनांची पार्किंग व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात आली आहे. त्यामुळे थेट गडाच्या पायथ्यापर्यंत वाहने नेणाऱ्या पर्यटकांवरही निर्बंध आले आहेत.

वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर गडावरील स्वच्छता, सुरक्षा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याची भावना फुकेरी ग्रामस्थ तसेच सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दूर्ग हनुमंत गडावर कोणत्याही प्रकारचे अयोग्य कृत्य, हुल्लडबाजी किंवा बेकायदेशीर प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किंवा फुकेरीचे सरपंच यांच्याशी 88051 41611 / 94043 67752 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!