गोव्यातील तरुणाला दोडामार्ग एलसीबीची बेड्या; चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटक
गोव्यातील तरुणाला दोडामार्ग एलसीबीची बेड्या; चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटक
दारू पिण्यास व अश्लील कृत्यास विरोध केल्याचा राग; तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
दोडामार्ग | प्रतिनिधी
दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीतील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे गोव्यातील एका संशयिताला शिताफीने अटक केली आहे. चेतन दयानंद कोरगावकर (वय ३६, रा. सांताक्रूझ, ओल्ड गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३१, ३२९(३), ३५१(३), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)/१३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहन सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते घरी असताना त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये एक अनोळखी युवक दारू पित होता, तर त्याच्यासोबत असलेली तरुणी एका कोपऱ्यात लघुशंका करत होती. फिर्यादी यांनी त्यांना असे कृत्य करू नये, असे सांगितल्याने आरोपी संतापला. त्यानंतर त्याने गाडीतून चाकू काढून फिर्यादी रोहन चव्हाण व त्यांच्यासोबत असलेले शुभम मुळगांवकर यांच्या दिशेने धावत जाऊन शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी आपल्या मैत्रिणीसह GA-07-E-6051 क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून घटनास्थळावरून पसार झाला.
या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चेतन कोरगावकर याचा शोध घेतला. १४ जुलै २०२६ रोजी त्याला त्याच्या राहत्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार जॅकसन घोन्सालविस, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, पोलीस अंमलदार अमर कांडर तसेच महिला पोलीस शिपाई धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

