कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

गिरिजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक; विनायक राऊत व कुटुंबीयांचा निषेध

गिरिजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक; विनायक राऊत व कुटुंबीयांचा निषेध

मानवाधिकार संस्थेकडे दाद मागणार; पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार, महिला मोर्चाच्या अध्यक्षा -मोहिनी वडगावकर

सावंतवाडी, दि. १२ :
गिरिजा राऊत प्रकरणावरून सावंतवाडीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून, भाजप महिला मोर्चाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत महिला मोर्चाने विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबीयांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत पीडित गिरिजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर म्हणाल्या की, महिलांच्या हक्कांसाठी नेहमी आवाज उठविणाऱ्या काही संघटना व व्यक्ती या प्रकरणात संबंधित महिलेच्या पाठीशी का उभ्या राहत नाहीत, हा मोठा प्रश्न असून त्यांची भूमिका संशयास्पद वाटते. गिरिजा राऊत यांच्या न्यायासाठी भाजप महिला मोर्चा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.
या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढाई लढली जाईल. तसेच मानवाधिकार संस्थेच्या माध्यमातूनही या प्रकरणाचा पाठपुरावा करून संबंधित महिलेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्यात येईल, असा इशाराही महिला मोर्चाने दिला.
याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेत न्यायासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्षा ज्योती मुद्राळे, सरचिटणीस मेघना साळगावकर, चिटणीस मेघा भोगटे, अन्वी मेस्त्री, साक्षी गावस तसेच महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्वांनी विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित वर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त करत गिरिजा राऊत यांना न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!