आंबोलीत वर्षा पर्यटन हंगामात अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी
आंबोलीत वर्षा पर्यटन हंगामात अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी;
आंबोली, दि. ११ जुलै : राज्यातील प्रसिद्ध वर्षा पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीमध्ये सध्या वर्षा पर्यटन हंगाम बहरात असून हजारो पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत पर्यटन हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी वर्षा पर्यटन नियोजन बैठकीत ग्रामस्थांनी अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये शनिवार व रविवार या दिवशी आंबोली घाटमार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आली होती.
बैठकीतील सूचनांनुसार पोलीस प्रशासनाकडून शनिवार-रविवारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे अपेक्षित होते. मात्र, शनिवारी (दि. ११ जुलै) प्रत्यक्षात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्नाटकातून येणारे चिरांचे ट्रक तसेच इतर मोठी मालवाहू वाहने घाटमार्गावरून सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली . परिणामी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही मनस्थाप सहन
करावा लागला.
या प्रकारामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आमदार दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी आमदार केसरकर यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून वर्षा पर्यटन हंगामात विशेषतः शनिवार व रविवार या दिवशी अवजड वाहतूक बंद ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
पर्यटन हंगामाच्या काळात आंबोली घाटमार्गावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्याने अवजड वाहनांवर प्रभावी निर्बंध घालून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी पुन्हा एकदा ग्रामस्थ व पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

