कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

वैश्य भवन प्रकरणाला मोठे वळण; धर्मादाय आयुक्तांकडून खासगी कंपनीच्या कामाला स्थगिती!

वैश्य भवन प्रकरणाला मोठे वळण; धर्मादाय आयुक्तांकडून खासगी कंपनीच्या कामाला स्थगिती!

वैश्य समाजाच्या तक्रारीची दखल; पुढील आदेशापर्यंत कोणतेही काम बंद – अनधिकृत भाडेकरारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सावंतवाडी, दि. १० :
येथील वैश्य भवन इमारतीमध्ये सुरू असलेल्या एका खासगी कंपनीच्या नव्या कार्यालयाच्या कामाला कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. पुढील आदेश होईपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत. वैश्य समाज बांधवांच्या एका गटाने केलेल्या तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून, त्यामुळे या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
या संदर्भात उद्योजक रमेश भाट, अमित गवडळकर, पुष्पलता कोरगावकर, संतोष मुंज, अरुण भिसे, आनंद नेवगी आणि शुभांगी सुकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.त्यांच्या म्हणण्यानुसार, वैश्य भवन हॉल एका खासगी कंपनीला देण्यास समाजातील अनेकांचा विरोध असतानाही रमेश बोंद्रे व बाळ बोर्डेकर यांनी संबंधित कंपनीच्या संचालकाशी करार करून युद्धपातळीवर काम सुरू केले होते. हा करार समाजाला विश्वासात न घेता आणि अधिकृत ट्रस्टी नसताना करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या विरोधात समाज बांधवांनी थेट कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तालयात धाव घेतली. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर आयुक्तांनी कामाला स्थगिती देण्याचा आदेश दिला.उद्योजक रमेश भाट यांनी सांगितले की, सध्या इमारतीवर कोणताही अधिकृत ट्रस्टी नसताना भाडेकरार करणे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे हा व्यवहार अवैध असल्याचा दावा करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत झालेले व्यवहारही चौकशीअंती रद्द करण्याची आणि भविष्यात इमारतीतील इतर गाळ्यांबाबतही स्थगिती आदेश मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरुण भिसे यांनी सांगितले की, हा वैश्य समाजाचा अंतर्गत विषय असल्याने समाजाची प्रतिमा जपण्यासाठी अनेक दिवस संयम बाळगला. मात्र सातत्याने चुकीच्या घडामोडी होत असल्याने अखेर संपूर्ण समाज एकत्र येत न्यायासाठी आवाज उठवावा लागला.
या बैठकीस तनुजा पोकळे, जयेश स्वार, अवधूत नार्वेकर, शैलेश गावंडळकर, मुन्ना कोरगावकर, शंभू विरणोडकर, संजय नार्वेकर, अण्णा म्हापसेकर, नाना गवंडळकर, सुनील मिसाळ, सुदेश नेवगी, हर्षद पोकळे, कपिल कोरगावकर, प्रतिक कोरगावकर, श्रेयस मुंज, ऋतिक कोरगावकर, पल्लवी स्वार, सत्यवान बांदेकर, नित्यानंद कोरगावकर, तुषार कोरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!