दारू माफियांना पोलिसांच्याच घरातून ‘टिप’? व्हायरल व्हिडिओने सिंधुदुर्ग पोलीस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह!
दारू माफियांना पोलिसांच्याच घरातून ‘टिप’? व्हायरल व्हिडिओने सिंधुदुर्ग पोलीस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह!
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल; कार्यरत कर्मचाऱ्याचाही उल्लेख… अवैध धंद्यांवर कारवाई की माहिती गळती? पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष
सावंतवाडी, दि ०६ : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या छाप्याची माहिती संबंधित दारू विक्रेत्याला आधीच देण्यात आल्याचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामध्ये दिसणारी व्यक्ती काही महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत असलेला दुसरा पोलीस कर्मचारी आजही सेवेत कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
व्हिडिओतील संभाषणात संबंधित दारू विक्रेत्याला, “छापा पडणार आहे, याची माहिती आम्ही आधीच दिली होती. तरीही तुम्ही पुन्हा तेच केले. आता काय करायचे?” अशा आशयाचे बोलणे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच सुमारे आठ लाख रुपयांची दारू जप्त झाल्याचाही उल्लेख या संभाषणात असल्याचे दिसून येते.
जर हा व्हिडिओ आणि त्यातील संभाषण सत्य असेल, तर अवैध दारू व्यवसायाविरोधातील कारवाईची माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस यंत्रणेतूनच होत होते का? असा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य नागरिकांनी कायद्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा, अशी भावना व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचा दावा शासन आणि पोलीस प्रशासन सातत्याने करत असताना, अशा प्रकारचा कथित व्हिडिओ समोर येणे अत्यंत धक्कादायक मानले जात आहे.
आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कारवाई होणार का? अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सिंधुदुर्गचे लक्ष लागले आहे.

