क्राइममहाराष्ट्र

पुण्यात फार्महाऊसवर पोलिसांचा धाडसी छापा; हुक्का पार्टीवर कारवाई, ७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात फार्महाऊसवर पोलिसांचा धाडसी छापा; हुक्का पार्टीवर कारवाई, ७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

पिसोळी परिसरातील फार्महाऊसमध्ये सुरू होता बेकायदा हुक्का विक्री व सेवन; ८ ते १० जण ताब्यात, दोन आरोपींवर गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी :
पुण्यातील कोंढवा परिसरातील पिसोळी येथे एका फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकत बेकायदा हुक्का विक्री व सेवन सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत तब्बल ७५ लाख ८० हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन प्रमुख आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर काळेपडळ पोलिस ठाण्याच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी तेथे ८ ते १० जण हुक्क्याचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले.
*जप्त मुद्देमालात काय?*
कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन चारचाकी, दोन दुचाकी, १२ मोबाईल फोन, ८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर तसेच अन्य साहित्य असा एकूण ७५.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अनिस सय्यद आणि त्याचा साथीदार साद सय्यद यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेते पुढील तपास करत आहेत.
*वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई*
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपआयुक्त जीवन बैनिवाल, सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार नर्तगिरे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
बेकायदा हुक्का पार्लर आणि फार्महाऊस पार्ट्यांवर पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!