गाव-धाकोरे हादरले! संशयित मांस तस्कराचा थरार; पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या अंगावर घातली गाडी
गाव-धाकोरे हादरले!
संशयित मांस तस्कराचा थरार; पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या अंगावर घातली गाडी
“मांस फेकून आरोपी फरार”; विनायक झाटये थोडक्यात बचावले, परिसरात संतापाची लाट
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव-धाकोरे परिसरात अवैध मांस तस्करीच्या संशयावरून बुधवारी थरारक घटना घडली. संशयित मांस वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीने पाठलाग करणाऱ्या विनायक प्रभू झाटये या तरुणाच्या अंगावर थेट गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित व्यक्ती या भागात सातत्याने संशयास्पद मांसाची वाहतूक करत असल्याची चर्चा होती. यापूर्वीही अनेक वेळा त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. बुधवारी पुन्हा एकदा त्याचा पाठलाग सुरू असताना आरोपीने थेट विनायक झाटये यांच्या दिशेने भरधाव गाडी घातली.
या भीषण प्रसंगात विनायक रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांत फेकले गेल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. घटनेदरम्यान विनायक यांच्या भावानेही स्वतःची गाडी आडवी लावून आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने बेदरकार वेगात वाहन चालवत तेथून पलायन केले.
*“पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?”*
पाठलाग सुरू असतानाच आरोपीने आपल्या वाहनातील संशयित मांस रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती विनायक प्रभू झाटये यांनी दिली. हे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी संबंधित मांस जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*आरोपीवर आधीही गुन्हे?*
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आरोपीवर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. “आज विनायक वाचला; उद्या एखाद्याचा जीवही जाऊ शकतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. बेदरकार वाहन चालवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
*पोलिसांचा तपास सुरू*
या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून, जप्त केलेल्या मांसाचा अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हे आणि कायदेशीर कारवाई निश्चित होणार आहे. मात्र, या घटनेने आजगाव-धाकोरे परिसरात अवैध मांस तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

