कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

अचानक वाढलेल्या वीजदाबाने नागरिकांचे उपकरणे जळाली; वीज वितरणाच्या गलथान कारभारावर संताप

अचानक वाढलेल्या वीजदाबाने नागरिकांचे उपकरणे जळाली; वीज वितरणाच्या गलथान कारभारावर संताप
“दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज बंद, रात्री अपरात्री लोडशेडिंग; नागरिक हैराण” — माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी शहरातील पाटील कॉम्प्लेक्स डीपी परिसरात अचानक वाढलेल्या वीजदाबामुळे अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. फ्रिज, टीव्ही, पंखे, इन्व्हर्टर तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर महावितरणच्या गलथान आणि निष्काळजी कारभारावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार टीका केली आहे. “सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली शहरभर दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला. प्रचंड उकाड्यात नागरिक अक्षरशः हैराण झाले. त्यातच रात्री अपरात्री वारंवार लाईट जाण्याचे प्रकार सुरू आहेत. एका बाजूला उकाडा आणि दुसऱ्या बाजूला डासांचा त्रास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत,” असे त्यांनी म्हटले.
साळगावकर यांनी महावितरणवर गंभीर आरोप करताना सांगितले की, “कॉन्ट्रॅक्ट बेसवरील कामगारांकडून काम करून घेतले जाते; मात्र त्यांच्या कामावर कोणतेही सक्षम सुपरव्हिजन दिसून येत नाही. यामुळे तांत्रिक बिघाड वाढत असून त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे.”
पाटील कॉम्प्लेक्स डीपी परिसरातील नागरिकांचे झालेले आर्थिक नुकसान महावितरणने तत्काळ भरून द्यावे, तसेच शहरातील विस्कळीत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली. “वेळीच दखल घ्या, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!