जनसेवेसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध : आमदार निलेश राणे
जनसेवेसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध : आमदार निलेश राणे
मालवण आमसभा उत्साहात संपन्न; नागरिकांशी थेट संवादातून प्रश्नांना तात्काळ न्याय
मालवण | प्रतिनिधी
जनता हाच केंद्रबिंदू मानत आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तालुक्याची आमसभा तब्बल नऊ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडली. या आमसभेत ग्रामस्थांनी मांडलेले अनेक प्रश्न आमदारांनी ऑन दि स्पॉट सोडवत आपल्या कार्यक्षम आणि तत्पर नेतृत्वाची प्रचिती दिली.
नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि समस्या जाणून घेत प्रत्येक मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. प्रशासनातील विविध विभागांकडून सविस्तर आढावा घेत, समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी आमदारांनी व्यक्त केला. “जनतेच्या हितासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात येईल,” असा विश्वासही त्यांनी दिला.
*“विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही”*
मागील दहा वर्षांत मतदारसंघात निधीची कमतरता होती, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. “शेकडो कोटींचा निधी मतदारसंघात आणण्यात यश आले असून, यापुढेही विकासासाठी निधी येत राहील. मात्र त्याचा योग्य वापर होऊन कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत,” असे स्पष्ट मत आमदार निलेश राणे यांनी मांडले.
यावेळी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने शासनाच्या माध्यमातून जनसेवा आणि विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कामाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
*कामचुकार ठेकेदारांवर कारवाईचे आदेश*
रस्ते कामांबाबत येणाऱ्या तक्रारींवर कठोर भूमिका घेत, “निकृष्ट आणि कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका,” असे स्पष्ट आदेश आमदारांनी अधिकाऱ्यांना दिले. दर्जेदार कामांवर भर देत विकासात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
*“असे आमदार लाभले हे आमचे भाग्य”*
आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे उपस्थित ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले. “जनतेचा आवाज बनून विधानसभेत प्रश्न मांडणारे आणि प्राधान्याने सोडवणारे आमदार लाभले, हे आमचे भाग्य आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
*मान्यवरांची उपस्थिती*
या आमसभेला जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
*जनतेशी थेट संवाद, तात्काळ निर्णय आणि विकासाची स्पष्ट दिशा* — या तिन्ही गोष्टींमुळे मालवणची ही आमसभा यशस्वी ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

