सावंतवाडी-शिरोडा मार्गावर खड्ड्यामुळे भीषण अपघात; दशावतार कलाकार थोडक्यात बचावले
सावंतवाडी, दि. १४: सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळासमोर आज सायंकाळी ६:१५ च्या सुमारास टाटा मॅजिक (सहासीटर) आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. गिरगाव (ता. कुडाळ) येथील ‘सिंधू कला नाट्य मंडळ’ या दशावतार मंडळाचे कलाकार आपला कार्यक्रम आटोपून प्रवास करत असताना, रस्त्यावरील एक मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात गाडी उसळली आणि चालकाचा ताबा सुटल्याने ती समोरून येणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत टाटा मॅजिकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे, तर सुदैवाने गाडीतील इतर दशावतार कलाकार किरकोळ दुखापतीवर निभावले आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळेच हा अपघात घडल्याने स्थानिक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत असून, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत.

