कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

निरवडे येथील सिल्वर एकर इमारतीच्या आवारात आढळली मगर

*निरवडे येथील सिल्वर एकर इमारतीच्या आवारात आढळली मगर*

*वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मगर जेरबंद*

*सहदेव राऊळ*

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरातील निरवडे येथील सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यात आज सायंकाळी सुमारे चार फूट लांबीची मगर आढळून आली. थेट मानवी वस्तीत व इमारतीच्या आवारात मगर दिसून आल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडून सुरक्षितपणे जेरबंद करत नैसर्गिक अधिवासात सोडले.
सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यावरील बंद घराच्या बाजूला असलेल्या अंगणात ही मगर आढळून आली. सुरुवातीला संशयास्पद हालचाल जाणवल्यानंतर जवळ जाऊन पाहिले असता मगर असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती परिसरात पसरताच मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मळगाव–निरवडे रेल्वे स्थानक परिसर व आजूबाजूच्या नैसर्गिक अधिवासाचा विचार करता, भक्ष्याच्या शोधात ही मगर नागरी वस्तीत शिरली असावी, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या जलद कृती दलाचे बबन रेडकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक खबरदारी घेत मगरीला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाने वेळीच कारवाई केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मगरीला ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!