पालकमंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश! कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर तयार
पालकमंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश!
कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर तयार
मुंबई | कोल्हापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी या 108 किमी रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाल्याने विकासाच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार असताना केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नारायण राणे यांचे मार्गदर्शन व योगदान यामुळेच हा टप्पा गाठता आल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोकणातील दळणवळण सुधारण्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेल्वे जाळ्याशी थेट जोडण्यासाठी या प्रकल्पाची गरज अधोरेखित करत नितेश राणे यांनी आमदार असताना केंद्र आणि राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. आता पालकमंत्री म्हणूनही त्यांनी या प्रकल्पासाठी वेगाने हालचाली करून प्रशासनाला गती दिली, त्याचे फलित म्हणून डीपीआर तयार झाल्याचे मानले जात आहे.
तसेच, केंद्रात प्रभावी भूमिका बजावत खासदार नारायण राणे यांनीही या प्रकल्पासाठी आवश्यक पाठबळ दिले. त्यांच्या अनुभवाचा आणि संपर्कांचा मोठा फायदा या प्रक्रियेत झाला असल्याचे बोलले जात आहे.
सध्या या प्रकल्पासाठी राज्य सरकार, नीती आयोग आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्याकडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होईल.दरम्यान, कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सध्या 30 रेल्वेगाड्या धावत असून मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी कोल्हापूर जोडले गेले आहे. या नव्या रेल्वेमार्गामुळे कोकणालाही अशाच व्यापक रेल्वे जाळ्याचा लाभ मिळणार आहे.
एकूणच, राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत असून, कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे प्रकल्प कोकणाच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणार, असा विश्वास व्यक्त होत आहे.

