कौशल्यच यशाची गुरुकिल्ली; एसएसआय कॉम्प्युटरचे योगदान मोलाचे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
कौशल्यच यशाची गुरुकिल्ली; एसएसआय कॉम्प्युटरचे योगदान मोलाचे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सावंतवाडी :
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवून थांबणे पुरेसे नाही, तर स्वतःची बाजारातील किंमत वाढवण्यासाठी सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. कौशल्य विकास हेच खरे भविष्य घडवणारे साधन असून, या क्षेत्रात एसएसआय कॉम्प्युटर सारख्या संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण आणि २०२५-२६ च्या नवीन तुकडीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून एआय (Artificial Intelligence) सारख्या प्रगत प्रणालींशी विद्यार्थ्यांनी अद्ययावत राहणे ही काळाची गरज आहे. “कायम शिकण्याची वृत्ती आणि स्वतःला अपडेट ठेवण्याची तयारी असेल, तर यश निश्चित मिळते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशासकीय कामकाजाच्या व्यापात नागरिकांशी थेट संवाद कमी होतो, मात्र अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संपर्क साधता येतो, असे सांगत त्यांनी खासगी संस्था आणि प्रशासन यांचा समन्वय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. एसएसआय संस्थेने २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देत समाजासाठी मोठे योगदान दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांनी घराच्या चौकटीबाहेर येऊन स्वतःच्या प्रगतीसाठी आणि समाजासाठी योगदान देणे ही सकारात्मक व प्रेरणादायी बाब
असल्याचे.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या डॉ. मुग्धा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, युवा उद्योजिका ऐश्वर्या शेठ कोरगांवकर यांच्या वतीने अन्नपूर्णा कोरगांवकर यांचा सन्मान करण्यात आला. बाल धावपटू कबीर हेरेकर याचाही विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी केंद्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कविता नाईक, सुखदा नाईक, मिताली केदार तसेच ब्रँड अॅम्बेसेडर अनुष्का वर्दम यांचा सत्कार झाला. सिद्धी निखार्गे, पुर्वा कासार, भाग्यश्री राऊळ, संदेश गवस आणि संजना मातोंडकर या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एसएसआय कॉम्प्युटरचे चेअरमन रघुनाथ तानावडे व डॉ. गौरी तानावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल त्यांनी उलगडून सांगितली. यावेळी प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, प्राचार्य कैलास राबते, उमेश गाळवणकर, ॲड. नकुल पार्सेकर, भूपतसेन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
एकूणच, कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना सक्षम बनवण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

