कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवरायांचा विचार जपणे हीच खरी शिवजयंती — ना. नितेश राणे

शिवरायांचा विचार जपणे हीच खरी शिवजयंती — ना. नितेश राणे

‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ कार्यक्रमास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी | प्रतिनिधी :
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला खरी ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आज आपण हिंदू म्हणून जो श्वास घेत आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय शिवरायांना जाते,” असे ठाम प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सावंतवाडी येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवांतर्गत ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिवरायांचा आदर्श हाच प्रगतीचा मार्ग
*पालकमंत्री राणे पुढे म्हणाले*“महाराजांनी केवळ युद्धनीतीच नव्हे, तर आदर्श प्रशासन आणि रयतेला न्याय देण्याचा वस्तुपाठ घालून दिला. इस्लामिक आक्रमकांच्या काळात, जेव्हा माता-भगिनींची अब्रू धोक्यात होती, अशा कठीण प्रसंगी त्यांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करत आहे. आपण सर्वांनी स्वराज्याचे मावळे म्हणून हा विचार जपला पाहिजे.”
यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही कौतुक केले.
*शिवराय हेच स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान : दीपक केसरकर*
कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी शिवरायांच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकला. “शेतकऱ्यांचे धोरण, पर्यावरणाचे रक्षण आणि महिलांचा सन्मान या सर्व बाबतीत शिवाजी महाराज ‘जाणते राजे’ होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीही महाराज हेच मुख्य प्रेरणास्थान राहिले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
*महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
उद्घाटनानंतर लेखक व दिग्दर्शक राष्ट्रभूषण शाहिर रूपचंद चव्हाण यांचा ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा कार्यक्रम सादर झाला. शाहिरी व देशभक्तीपर गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडीकरांनी मोठी गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, युवराज लखमराजे भोसले, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, भूसंपादन अधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, दिग्दर्शक दीपक कदम तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी समीर घारे यांनी केले, तर आभार तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!