कोकणच्या राजकारणात नितेश राणेंचा ‘धमाका’
*कोकणच्या राजकारणात नितेश राणेंचा ‘धमाका’*
*ठाकरे सेनेचा किल्ला कोसळला; सतीश सावंतांसह शेकडो पदाधिकारी भाजपात दाखल*
कणकवली | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला असून ठाकरे शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर मशाल टाकून कमळ हाती घेतले आहे. कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात सतीश सावंत यांच्यासोबत शेकडो प्रमुख पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा पक्षांतराचा भूकंप ठाकरे गटासाठी मोठा राजकीय सुरुंग ठरला असून, सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
*हरकुळ बुद्रुकमध्ये ‘कमळ’ फुलले*
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये हरकुळ खुर्द सोसायटीचे व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर, अर्चना घाडीगावकर, अंकिता सावंत, माजी सरपंच संदीप रासम, सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर, नागवे येथील माजी सरपंच बाळा सावंत, चंद्रकांत सावंत, अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील सुमारे १५० प्रमुख कार्यकर्ते आणि हजारो समर्थकांचा समावेश आहे.
*जुने ऋणानुबंध पुन्हा जागले*
सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. काही काळ राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटाची वाट धरली होती. मात्र आता पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पुनरागमन झाल्याने ही घरवापसी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रवेशामुळे कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.
*ठाकरे शिवसेनेला मोठा झटका*
सतीश सावंत हे केवळ कार्यकर्ते नव्हते, तर ठाकरे शिवसेनेचा मजबूत कणा होते. त्यांच्या सोबत हरकुळ बु.चे सरपंच आनंद ठाकूर, भिरवडेचे सरपंच नितीन सावंत, बेनी डिसोझा, मंगेश सावंत यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांनीही पक्ष सोडल्याने ठाकरे गटाची स्थानिक संघटना पूर्णतः खिळखिळी झाली आहे. निवडणुकीआधीच झालेली ही गळती ठाकरे गटासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
*सहकार क्षेत्रातील सत्ता-समीकरणे बदलणार*
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा दबदबा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बँक, विविध विकास सोसायट्या आणि ग्रामीण अर्थकारणावर भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

