कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रुग्ण वाचवायचा की नियम पाळायचा? १०८ सेवेसाठी विशेष परवानगीची भाजप युवा नेते ॲड रूजूल पाटणकर यांची मागणी

*रुग्ण वाचवायचा की नियम पाळायचा? १०८ सेवेसाठी विशेष परवानगीची भाजप युवा नेते ॲड रूजूल पाटणकर यांची मागणी*

*सिंधुदुर्गात आपत्कालीन सेवेचा पेच; खाजगी रुग्णालयांसाठी १०८ हवीच*

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती आणि रुग्णांची तातडीची गरज लक्षात घेता १०८ रुग्णवाहिका सेवा खाजगी रुग्णालयांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे युवा नेते रुजूल पाटणकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना सकारात्मक धोरण ठरवण्याची विनंती केली आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते. तसेच काही ग्रामीण भागांतून रुग्णालयांपर्यंतचे अंतर अधिक असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र, अशा वेळी रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर झाल्यास पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी किंवा जिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज भासते. यावेळी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण होते.
१०८ रुग्णवाहिका नियंत्रण कक्षाकडून “खाजगी रुग्णालयात सेवा दिली जात नाही” असे सांगितले जाते. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते, तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते.
रुजूल पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, खाजगी रुग्णवाहिकांचा खर्च सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना परवडणारा नाही. खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण हलवताना कुटुंबाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.
ही समस्या कायमची दूर करण्यासाठी जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी आणि जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ही सेवा रुग्णांना मोफत व वेळेत मिळू शकेल, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संवेदनशील विषयाकडे पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!