खाजगी रुग्णालयांची लूट थांबवा, नाहीतर कुलूपबंद करा – पालकमंत्री नितेश राणे यांचा इशारा
खाजगी रुग्णालयांची लूट थांबवा, नाहीतर कुलूपबंद करा – पालकमंत्री नितेश राणे यांचा इशारा
कणकवली, दि. २० :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी आरोग्य व्यवस्थेत सुरू असलेले गैरप्रकार, पॅकेजच्या नावाखाली रुग्णांची उघड लूट आणि गरीब रुग्णांची गळचेपी यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी अखेर कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई नर्सिंग होम अॅक्टप्रमाणे नियम तोडणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर थेट कारवाई करा, गरज पडल्यास आस्थापना कुलूपबंद करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुबोध इंगळे यांना दिले आहेत.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, भगवान लोके, उमेश बुचडे, सादिक कुडाळकर, सुरेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा काळा कारभार थेट त्यांच्या निदर्शनास आणला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार चिपळूणकर, कणकवली उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, मुख्य औषध निर्माण अधिकारी अनिलकुमार देसाई आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने खाजगी रुग्णालयांत सर्रास सुरू असलेली पॅकेज पद्धत तात्काळ बंद करण्याची, दर्शनी ठिकाणी दरपत्रक लावणे सक्तीचे करण्याची आणि गोरगरीब रुग्णांना माफक दरात उपचार देण्याची ठाम मागणी केली. तसेच काही डॉक्टरांच्या संगनमताने शासकीय आरोग्य यंत्रणा मुद्दाम कमकुवत केली जात असल्याची गंभीर तक्रार करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तवही उघड झाले. गेल्या एक महिन्यापासून सिटीस्कॅन मशीन बंद आहे. टुडी इको व सोनोग्राफीची अद्ययावत यंत्रणा असूनही रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नाहीत. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने महिलांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. मंजूर १८ डॉक्टरांच्या पदांपैकी केवळ दोन कायमस्वरूपी डॉक्टर कार्यरत असून तब्बल १६ पदे रिक्त आहेत. १०० खाटांचे रुग्णालय असून आयसीयू युनिट काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे आणि त्याचे लायसन्सही रद्द झाले आहे. नवीन एक्स-रे मशीन येऊनही ते कार्यान्वित नाही. १०२ रुग्णवाहिकेसाठी एकच चालक असल्याने आपत्कालीन सेवाही कोलमडली आहे. परिणामी ओपीडीची संख्या ४००-५०० वरून मोठ्या प्रमाणात घटली आहे.
या सर्व समस्यांवर तातडीने शासनस्तरावर उपाययोजना करण्याची मागणी भगवान लोके, बाळू मेस्त्री आणि अशोक करंबेळकर यांनी केली.
यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. “मानवतेच्या भावनेने काम करा. जे चुकीचे आहे त्याच्यावर मुंबई नर्सिंग होम अॅक्टप्रमाणे कठोर कारवाई करा. तुम्ही मनावर घेतले तरच जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न मार्गी लागतील,” असे स्पष्ट निर्देश देत खाजगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करून गरीब रुग्णांची होणारी गळचेपी थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला.

