ॲड.किशोर वरक आणि सुरेश झोरे जोडगोळीचे कारनामे उजेडात! कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ!*
*ॲड.किशोर वरक आणि सुरेश झोरे जोडगोळीचे कारनामे उजेडात! कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ!*
*बहुचर्चित सिद्धीविनायक बिडवलकर खून प्रकरणाला नवी कलाटणी!*
*आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे वारंवार सांगत असलेल्या सिद्धेश शिरसाटला न अडकवण्यासाठी करण्यात आली होती तब्बल दहा लाख रुपयांची मागणी, पत्नी सिद्धी शिरसाट यांची पोलिसात तक्रार*
ॲड.किशोर वरक आणि किशोर झोरे यांचे कारनामे पुन्हा एकदा सिद्धीविनायक बिडवलकर खून प्रकरणी उजेडात आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी फ्लॅटच्या भाडेविषयातून युवकाला तोंडाला फडके बांधून बेदम मारहाण केल्या प्रकरणीच्या तक्रारीला वेगळे वळण लागत त्यातून क्लीन चिट मिळेपर्यंत हा दुसरा विषय उघडकीस आला आहे. यापूर्वी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून नेमके ते वकिलीचा उपयोग करून त्याखाली गुन्हेगारी कृत्यांना अंजाम तर देत ते लपवण्यासाठी तर करत नाहीत ना, याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कुडाळमधील सिद्धेश शिरसाट यांनी दहा लाख रुपये न दिल्यास त्यांच्याविरोधात ॲड. किशोर वरक तक्रार दाखल करु, तसेच त्यांना मोका लावून अडकवण्यात येईल अशी धमकी ॲड किशोर वरक यांच्या वतीने त्यांचे मित्र सुरेश झोरे यांनी दिली होती, तसेच ॲड किशोर वरक यांनी आपल्या परिचित व्यक्तीकडून एक लाख रुपये त्यासाठी घेतल्याची तक्रार सिद्धेश शिरसाट यांची पत्नी सिद्धी सिद्धेश शिरसाट यांनी कुडाळ पोलीस स्थानकात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०८(२), २३८(३), ३३८(७), ३(५) अन्वये गुन्हा नोंद केला असून कुडाळ पोलीस स्टेशनचे पीएसआय राजेंद्र मगदूम हे पुढील तपास करत आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी आहे की सौ सिद्धी सिद्धेश शिरसाट यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्या म्हणतात, एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात मी व पती सिद्धेश शिरसाट घरी असताना पावशी येथील योगेश तुळसकर हे घरी आले व त्यांनी सांगितले की हिर्लोक येथील सुरेश झोरे याचा त्यांना फोन आला. त्याने चेंदवण येथील सिद्धिविनायक बिडवलकर हा युवक बेपत्ता झालेबाबतच्या तक्रारीमध्ये सिद्धेश शिरसाट यांचा हात असल्याची तक्रार ॲड किशोर वरक हे सिद्धेश शिरसाट यांचे विरुद्ध तक्रार करणार असल्याची माहिती दिली असल्याचे सांगितले. त्यामध्ये सिद्धेश शिरसाट यांना त्रास होणार असल्याचे सांगत तक्रार होऊ नये यासाठी ॲड किशोर वरक यांना भेटून प्रकरण मिटवावे असा किशोर वरक यांचा निरोप असल्याचे सांगितले. त्यावेळी सिद्धेश शिरसाठ याने सदर प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितल्याने आम्ही ॲड. किशोर वरक यास भेटलो नाही. त्यानंतर माझे पती सिद्धेश अशोक शिरसाट यांचेवर सिद्धिविनायक बिडवलकर यांचा खून केल्याप्रकरणी निवती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाशी माझ्या पतीचा काहीही संबंध नसताना देखील पती व त्याचे इतर कामगार यांना अटक करण्यात आलेली होती.
पती सिद्धेश शिरसाठ हे जेलमध्ये असताना पावशी येथील योगेश तुळसकर यांनी मला फोन करून ॲड किशोर वरक हे सरकारी वकीलांसोबत न्यायालयात काम पाहणार आहेत व ते सिद्धेशला मोक्का लावणार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन होणार नाही असे सांगून मोक्का लावायचा नसल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील असा किशोर वरक यांचा निरोप असल्याचे वरक यांचा साथीदार सुरेश झोरे यांनी दिला असल्याचे सांगितले. पतीला खुनाच्या गुन्ह्यात अटक केल्याने त्यांना पुन्हा मोका लागल्यास त्रास होणारा असल्याने मी घाबरले. पतीला जेलमध्ये भेटले त्यावेळी ॲड वरक याने दहा लाख रुपये मागणी केल्याचा निरोप सांगितला. पतीने त्यांची भेट घेऊन ते काय म्हणतात ते बघा असे सांगितले. ओरोस येथील त्यांचा मित्र हार्दिक शिगले यास भेटून त्याची मदत घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हार्दिक शिकल्यास भेटून हकीकत सांगितली. योगेश तुळसकर व हार्दिक शिगले यांनी ॲड. किशोर वरक व सुरेश झोरे यांची भेट घेतली असता घेतली असता त्यांनी सिद्धेश शिरसाट यास मोका लावायचा नसल्यास व जामीन हवा असल्यास आपणास दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तसेच ॲडव्हान्स म्हणून पाच लाख रुपयांची मागणी केली त्यावेळी त्यांना अडीच लाख रुपये ऍडव्हान्स देण्याचे ठरले. परंतु त्यानंतर सिद्धेश शिरसाट यांचा जामीन मंजूर झाल्याने आम्ही किशोर वरक यांना त्यांनी मागणी केलेले पैसे दिले नाहीत. मात्र योगेश तुळसकर यांच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले असल्याचे समोर आले.पोलिसांनी सिद्धेश शिरसाट यांना जामीन झाल्यानंतर लगोलगच हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी केली, त्यामुळे ते गोव्यात राहण्यास गेले. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच पती गोवा येथे असल्याने मला त्यावेळी तक्रार देता आली नव्हती असे या तक्रारीत सिद्धी शिरसाट यांनी म्हंटले आहे. पुराव्यादाखल सुरेश झोरे यांच्याशी झालेल्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह त्यांनी तक्रारीसोबत पोलिसांकडे दिला आहे.
या तपासातून एकूणच प्रकरणाच्या तपासाला कोणती दिशा मिळते आणि ॲड किशोर वरक व साथीदाराच्या कारनाम्यांवर पोलीस कोणती कारवाई करतात याकडे कुडाळवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

